sharethis sharing button messenger sharing button facebook sharing button linkedin sharing button
sharethis sharing button messenger sharing button facebook sharing button linkedin sharing button

आयुर्वेद – समज आणि सत्य (लेख २)

Published on 05 ऑगस्ट 2022

कधी कधी साध्या तापासाठी, सर्दी खोकल्यासाठी आपण सहज उपाय सुचवतोच.. पण कित्येक जण ब्लडप्रेशर, डायबेटीस, दमा अशा सारख्या गंभीर अन दीर्घकालीन टिकून असलेल्या विकारांवरही हमखास उपाय सुचवत असतात.. अन जाता जाता, मी पण हेच घेतो / घेते, किंवा माझ्या आईला / वडिलांना झाला होता तेव्हा डॉक्टरने हेच औषध दिले होते.. असले निरर्थक रिमार्क्स पण मारुन जातात.. मी पण एखादे औषध घेतो / घेते म्हणजे ते दुस-याला लागू पडेलच असे नाही.. जर सगळे एवढे सोप्पे असते तर डॉक्टरकी करण्यात कुणी एवढी वर्षे का घालवली असती? डॉक्टर ह्या पदवीची अन शिक्षणाची आवश्यकताच काय? म्हणून डॉक्टरला / वैद्याला त्याचे काम करु द्या अन आपण आपले काम चोख करुया.. (अर्थात औषध घेण्याचे अन पथ्य पाळण्याचे.)

अशावेळी मला माझ्या आदरणीय नानल सरांचे एक वाक्य नेहमी आठवते… ते म्हणतात की, “कुठलाही शब्द वापरताना, कुठलेही वाक्य लिहिताना आणि कुठलाही उपाय सुचवताना त्याची संपूर्ण जबाबदारी घ्यावी लागते.. तशी जबाबदारी आपण घेणार असू तरच लिखाण करावे अन चिकित्सा करावी”.. आजही किती महत्वाची आहे ही गोष्ट… उद्या काहीही वेगळे / विपरीत झाल्यावर जर आपण त्याची जबाबदारी नाकारणार असू तर ते योग्य नाही.. आपण सुचवलेला उपाय चूक ठरु शकतो ह्याची कल्पना आपल्याला असते का? निश्चितच नसते.. कारण आपण स्वतः तेच औषध घेतलेलं असते, किंवा अजून कुणाला ते घेताना पाहिलेले वा ऐकलेले असते.. पण तरीही एखाद्यावेळी काही वेगळे झाले अन त्याला ते औषध लागू नाही पडले अन काही अपाय झालाच तर आपण घेणार आहोत का त्याची जबाबदारी?? जो अपाय झालाय तो आपण दूर करु शकणार आहोत का?? जर हो, तर खुशाल सल्ले द्या, अन त्याची योग्य ती जबाबदारी घ्या.. पण जर हे जमणार नसेल तर मग उपाय सुचवताना सावधान!! आपल्या नकळत आपण कुणाला तरी अजून त्रासात टाकू शकतो, एखाद्या गंभीर अपायाने.. एक छोटेसं उदाहरण देते, एखाद्याला डायबेटीसचा त्रास आहे अन आपण त्याला आपल्या ऐकीवातले नेहमीचे उपाय ’कारल्याचा रस’ वगैरे सुचवले तर?? आपल्याला असे वाटते की आपणही घेतोच आहोत, अन आपलीही शुगर कंट्रोल मधे आहे.. मग त्या व्यक्तीलाही फायदाच होईल.. पण अशावेळी हेही ध्यानात ठेवणे आवश्यक आहे की जर त्या व्यक्तीला अन्य काही पोटाचे आजार असतील, Gas मुळे पोटफुगी होत असेल, शौचाला साफ़ होत नसेल वा डायबेटीसबरोबरच संधिवातही असेल तर त्या व्यक्तीला कारली हा उपाय सुचवणे म्हणजे अपायच.. कारण त्यामुळे वात वाढून संधिवाताचा जोर वाढू शकतो.. ज्याचे वजन डायबेटीसमधे कमी झालेय त्याला पण कारल्याचा रस चालणार नाही.. मग अशावेळी अपाय आपण सुचवलेल्या उपायाने झालाय हे आपण स्वीकारत नाही अन ती व्यक्तीच योग्य ते पथ्य पाळत नसेल असा निष्कर्ष आपल्या सोयीनुसार सर्रास काढतो.. किंवा काहीवेळा असेही करतो की त्याच व्यक्तीला डायबेटीससाठी एक उपाय सुचवतो अन संधिवातासाठी दुसरा, जे कदाचित परस्परविरोधी असू शकतात.. पण आपल्याला माहीत नसते..

आता प्रश्न येतो की हे असे का होते? एकाला उपाय ठरलेली गोष्ट दुस-याला त्याच आजारात अपाय का ठरते?? ह्याचे कारण प्रत्येकाची देहप्रकृती, आजाराचे स्वरुप, कालावधी, त्यातली कॉंप्लिकेशन्स, आधीच झालेला एखादा आजार, राहणीमान, जेवणाच्या सवयी, व्यायाम अन खेळ ह्यांचा समावेश, मानसिक जडणघडण ह्यासारख्या अनेक गोष्टी दोन व्यक्तीत वेगवेगळ्या असू शकतात..

जसे लहानपणापसून आपल्याला गोड आवडत असेल तर आपल्या भावाला वा बहिणीला तिखट आवडत असते.. आपली अन इतरांची झोप कमीजास्त असते.. आपण कितीही मोठ्या संकटाला किंवा आजाराला सहज सामोरे जात असू, पण दुसरी व्यक्ती त्याच आजारात कुढून जाऊ शकते.. हतबल होऊ शकते.. आयुर्वेदात ’योग्य चिकित्सा’ म्हणजे काय हे सांगताना अतिशय महत्वाचा संदर्भ मिळतो, तो म्हणजे, तीच श्रेष्ठ चिकित्सा ज्यामुळे आजार तर बरा होतोच पण अन्य आजार वा अन्य उपद्रव (कॉंप्लिकेशन) उद्भवत नाही.. (खरेतर liver toxicity सारखे known side effects असलेली आधुनिक औषधे ह्या व्याख्येत कशी बसणार कुणास ठऊक?)… म्हणजेच उपाय सुचवताना आपल्याला हे ध्यानात ठेवणे आवश्यक आहे की आपल्या उपायाने एखाद्याला अपायही होऊ शकतो, अन जर अपाय झाला तर ती चूक त्या व्यक्तीची / औषधाची नसून आपलीच आहे.. अशावेळी आपल्या त्या औषधाची संपूर्ण माहिती असणे आवश्यक आहे.. कुणाला द्यावे ह्यापेक्षा कुणाला देऊ नये हे सगळ्यात आधी लक्षात ठेवले पाहिजे.. हा वैद्यकीय चिकित्सेला महत्वाचा नियम आहे..

आपण अशावेळी काय केले पाहिजे, पहिले म्हणजे जर आपल्याला औषधाची संपूर्ण माहिती नसेल तर कुणालाही फुकटचे सल्ले न देता वैद्याकडे पाठवून योग्य तो उपाय करायला लावला पाहिजे किंवा त्या औषधाची, आजाराची संपूर्ण माहिती करुन घेतली पाहिजे, त्याचा अभ्यास केला पाहिजे..

काही जणांना दुकानात जाऊन तक्रार सांगून औषध आणायचीही सवय असते.. तीही कितीतरी वेळा हानीकारक ठरु शकते.. कारण एक तक्रार ही अनेक आजारात समान असते.. अन अशावेळी जर योग्य डायग्नोसिस झाले नाही तर भलतेच औषध आपल्याकडून घेतले जाते.. त्याचा योग्य तो परिणाम होत नाही.. अन आयुर्वेदिक औषध उशीरा रिझल्ट देते ह्या अजून एका समजामुळे आपण वाट पहात राहतो, अन आजार अजून गंभीर बनत जातो… कदाचित सुरुवातीलाच डॉक्टरकडे जाऊन योग्य उपचार केले असते तर लवकर रिझल्ट मिळाले असते… पण आपल्याच सवयी आपल्याला त्रासदायक ठरतात.. अन लक्षात येईपर्यंत बराच उशीर झालेला असतो..

आयुर्वेदिक औषधाला सुद्धा साईड इफेक्ट्स असतात, जर अयोग्य व्यक्तीला, चुकीच्या आजारात अथवा चुकीच्या प्रमाणात दिले गेले तर… नीट डायग्नोसिस न होता औषध दिले तरी त्याचे साईड इफेक्ट्स दिसतात.. ज्या औषाधाने जो रिझल्ट अपेक्षित आहे तो न दिसता जे काही अपाय दिसतात ते म्हणजे “साईड इफेक्ट्स”.. अन ह्यात चूक आयुर्वेदाची निश्चितच नाही, तर ते उपाय सुचवणा-या व्यक्तीची आहे.. मग भले ती वैद्य असो वा सामान्य माणूस (जो इतरांना उपाय सुचवतो)…

देहप्रकृती, राहणीमान, मानसिक जडणघडण, मानसिक प्रकृति, ह्यासारख्या काही शब्दांची सविस्तर माहिती, तसेच अपाय का होऊ शकते ह्याचीही काही कारणं ह्या शब्दांशी संबंधित असतील ती पण विस्ताराने पुढच्या भागात देते..

originally Published on WordPress: 05 ऑक्टोबर 2009

read more blog from same series....

आयुर्वेद समज आणि सत्य लेख 3