आयुर्वेद हा शब्द कुठल्याही ग्रुपच्या, नातेवाईकांच्या गप्पांमधे आला की २ गोष्टी अपोआप सुरु होतात, एक म्हणजे आपल्याला माहीत असलेले मोजके उपाय दुस-याला सुचवायला सुरुवात करणे अन दुसरे म्हणजे आपल्याला असलेली अर्धवट माहिती छातीठोकपणे इतरांना पटवून देणे, तीही नातेवाईक वा मित्रांच्या संदर्भात ऐकलेली.. पण खरेच कधी जाणून नाही घ्यावेसं वाटत की आयुर्वेद म्हणजे नक्की काय? तुळस, ओवा, हिंग असले घरगुती उपचार म्हणजेच फक्त आयुर्वेद का? की सगळे उपाय करुन झाल्यावर राहिलेला उपाय म्हणजे आयुर्वेद? ज्याप्रमाणे रुढी अन शास्त्र ह्यामधे अनेकांचा गोंधळ असतो, तसेच काहीसे हल्ली आयुर्वेदाच्या बाबतीत दिसून येते..
आयुर्वेद म्हणजे नक्की काय ह्याबद्दल आजवर जेवढे काही समजलंय तेवढे ह्या लेखमालेतून इथे ठेवण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न.. आयुर्वेदाबद्दलचे समज, गैरसमज अन सत्य हे सारे स्पष्ट करणे हा ह्या लेखमालेचा उद्देश.. पहिल्या लेखात आपल्या मनात असलेले समज काही प्रमाणात मांडण्याचा प्रयत्न केला आहे.. उत्तरे हळुहळु पुढच्या लेखांमधे येतील.. सामान्यतः जे काही प्रचलित समज लोकांमधे आढळतात त्याचा उल्लेख पुढे केला आहे.. ह्यासारखे अजूनही काही समज आढळतात, त्यांचा उल्लेख पुढच्या लेखांमधे त्या त्या विषयांच्या अनुषंगाने येईल.. ह्यापैकी प्रत्येक समज वा गैरसमज अन सत्य ह्याचे सविस्तर विश्लेषण ह्यानंतरच्या लेखांमधे असेल, प्रत्येक समजासाठी स्वतंत्र लेख लिहिण्याचा प्रयत्न आहे.. इथे सर्वसामान्य विषयांची माडणी असेल, कुणाचेही वैयक्तिक अनुभव वा विशिष्ट रुग्णांचे अनुभव ह्याचा समावेश नाही..
✥ कधी कधी आपल्या नकळत आपण कुणालातरी काहीतरी उपाय सुचवतो.. मला माहीत आहे ते औषध, मागे पण कितीतरी जणांना दिले आहे ना ते अशा भ्रमात अनेकदा आपण फुकटचे सल्ले देत असतो.. अन ते अपाय ठरु शकते ह्याची आपल्याला पुसटशी सुद्धा कल्पना नसते.. पण जेव्हा एखाद्याला अपाय होतो, आपल्याला प्रश्न पडतो की मागच्यावेळी एकाला हाच उपाय सांगितला होता तर त्याला आराम पडला, मग आता का असे उलट झाले? अन अपाय झालाच तर त्याचे खापर अकारण आयुर्वेदाच्या माथी… पण खरेच हे असे का झाले ह्याचा शोध घेता येणं शक्य आहे..
✥ आजवर कायम ऐकलेली गोष्ट म्हणजे “आयुर्वेदिक औषधांना साईड इफेक्ट्स नसतात”.. हा प्रचार कुणी अन का सुरु केला हे शोधत बसणे शक्य नाही.. पण हे खरे आहे का?? तसाच अजून एक ठाम असलेला समज, “आयुर्वेदिक औषधाला एक्स्पायरी नसते”.. कधी एखादी संहिता (आयुर्वेदाची) उघडून पाहिली आहे का? त्यात काय सांगितले आहे नेमके ते शोधले का?? आत्ता उल्लेख केलेले हे दोन समज की गैरसमज??✥ करत असताना सामान्यपणे जे प्रश्न रुग्ण नेहमी विचारतात त्यापैकी एक म्हणजे, “तुम्हाला नाडी परिक्षा येते का?” जणू केवळ नाडी परिक्षा येणं म्हणजे आयुर्वेदात पारंगत अशी काहीशी कल्पना असते…
✥ आयुर्वेद म्हणजे केवळ औषधी उपचार अशीही समजूत असते.. आयुर्वेदात सर्जरी पण आहे का? हा प्रश्न तर हमखास ठरलेला… पण आयुर्वेदात शस्त्रचिकित्सेचे वर्णन आहे, नव्हे एक पूर्ण संहिता ’शस्त्रचिकित्सा’ ह्या वैद्यकीय अंगाची माहिती देते हे ऐकून आपल्या निश्चित नवल वाटले असेल…
✥ आयुर्वेदात क्वीक रिझल्ट्स नसतात हा तितकाच ठाम समज(?).. आयुर्वेदिक औषधं उशीरा काम करतात पण कायम स्वरुपी आराम मिळतो असली वाक्यं सर्रास ऐकू येत असतात.. पण त्रिभुवनकीर्तीसारखी गोळी १-२ तासात ताप पूर्ण कमी करते हे कधी पाहिले जात नाही..
वैद्याकडे गेले की काय खायचे ह्यापेक्षा काय खाऊ नये ह्याचीच यादी मोठी.. सगळे आवडते पदार्थच बंद करायला सांगितले आहेत.. काय सुख मिळते हे करुन कुणास ठाऊक.. ह्यासारखी वाक्यं पण घरोघरी ऐकू येतात..
✥ भस्म – हा तर गाजलेला विषय.. इतर देशात भस्मांचे विषारी परिणाम सांगितले गेले अन त्यामुळे आपणही ते खरे मानून भस्म असलेली औषधं म्हणजे विषच असा समज करुन घेतला.. भस्म असलेली औषधं घेतल्याने किडनी फेल होते असेही आपण वाचतो.. पण हे किती खरे आहे? अन कुठल्या भस्मामुळे हे होते? शुद्ध की अशुद्ध? भस्मं खरेच विषारी असतात का? त्याचे एवढे दुष्परिणाम असते तर आजवर ती वापरली गेली असती का?? आजही त्याचे तेच रिझल्ट मिळाले असते का जे हजार वर्षापूर्वी मिळत होते?? मग नक्की खरे काय??
✥ आयुर्वेदातली औषधे विज्ञानाच्या आधारे सिद्ध केलेली असतात का? संशोधन होणे गरजेचे आहे का? असेही प्रश्न आपल्या मनात असतात.. एक साधा विचार आहे की ज्या आयुर्वेदात जवळपास हजाराहून अधिक वनस्पतींचे वर्णन, त्याचे गुणधर्म, त्याचे आजारातील उपयोग सांगितले गेले आहेत ते हजार वर्षानंतर आजही तसेच सिद्ध होतात.. मग हे गुणधर्म, हे उपयोग प्रयोगाशिवाय झाले असेल का? संशोधनाशिवाय झाले असेल का? काही निश्चित आधार, सिद्धांत असल्याशिवाय एवढ्या रोगांवर एवढे उपाय सांगितले गेले असतील का?? काय विचार असेल ह्या सगळ्यामागे??
✥ आयुर्वेदात एड्ससाठी, Cancer साठी किंवा स्वाईन फ्लूसारख्या नव्या आजारांसाठी काही उपाय आहे का? हा प्रश्न कुठलाही नवीन आजार मोठ्या प्रमाणावर पसरु लागला की हमखास वैद्यांना विचारला जातोच… “डॉक्टरांनी सर्जरी करायला सांगितली आहे, पण म्हटले की आधी आयुर्वेदात काही उपाय आहे का, अन असतील तर करुन पाहावे”.. अशीही वाक्यं नवीन नाहीत… अशा स्थितीत रुग्ण आधीच गोंधळलेला असतो.. त्यामुळे लास्ट होप म्हणून हा एक समज मनात निर्माण झालेला असतो…
✥ इंटरनेट, आयुर्वेदिक उपाय असलेली सामान्य वाचकांसाठी असलेली पुस्तकं वाचून आलेला रुग्ण तर ’पंचकर्म’ ह्याबद्दल प्रश्न विचारणार हे तर माहीतच असते.. ’तुम्ही पण करता का पंचकर्म?’ किंवा मला ते टीव्हीवर दाखवतात ते पंचकर्म करुन घ्यायचेय.. तुमच्याकडे सोय आहे का? किंवा पंचकर्म नाही केले तर माझा आजार लवकर कसा बरा होईल? आमच्या नातेवाईकांनी ह्या आजारात पंचकर्मच करुन घेतले तेव्हा आराम आला.. ही असली वाक्यं अशा थाटात त्या वैद्याला ऐकवली जातात की जसे काही वैद्याला पंचकर्म हा शब्दच माहीत नाहीये अन आपणच तो त्याला सांगतोय.. पण पंचकर्म म्हणजे नेमके काय? केवळ शेक, मालिश अन ती टीव्हीमधे दाखवतात डोक्यावर तेल सोडतात ते म्हणजे पंचकर्म का? अन पंचकर्म आपल्याला मानवेल का? ते आपल्या देहप्रकॄती अन आजाराच्या अवस्थेनुसार योग्य आहे की नाही हे प्रश्न का नाही येत कधी… कारण पंचकर्माची खरी माहिती आपल्याला नसतेच.. जे काही माहीत असते ते कुणाकडून तरी ऐकलेले किंवा नेटवर वा टीव्हीवर पाहिलेले… मग नेमके काय आहे हे पंचकर्म??
✥ लहान मुलांसाठी काही टॉनिक आहे का आयुर्वेदात?? किंवा भूक लागेल असे काही औषध?? हल्ली तो / ती काही खातच नाही.. त्यामुळे तब्येत सुधारत नाही.. एखादे टॉनिक घेतल्यावर तब्येत सुधारेल ना त्याची / तिची?? १२ वर्षापर्यंत वयोगटातील मुलांच्या आईवडिलांचे हे प्रश्न नेहमी असतात… पण वयोगटानुसर ह्या प्रश्नांची उत्तरेही वेगळी असतात.. कारण मूळ समस्या वेगळी असते.. पण आयुर्वेदिक टॉनिकमुळे तब्येतीत फरक पडेल असा एक प्रचलित समज दिसतो… हा समज की गैरसमज?
ह्या अन अशा अजून काही समज – गैरसमजांवर काही सविस्तर लिहावे असे वाटले.. आयुर्वेद, त्याचा उद्देश अन त्यातले सत्य समोर आणावं असे वाटले म्हणून ही लेखमाला लिहायला सुरुवात करते आहे.. अजून काही शंका पुढच्या लेखांमधे समाविष्ट होत जातील…